स्पर्धापरीक्षांची विचारसरणी काय असते?
स्पर्धापरीक्षांची विचारसरणी काय असते?
भारताच्या परीक्षा व्यवस्थेनं यशापेक्षा अपयशाचीच निर्मिती केली आहे.
कोणत्याही स्पर्धात्मक स्वरूपाच्या परीक्षेमध्ये यश व अपयश अशा परस्परवर्जक वास्तवांचा समावेश असतो. स्पर्धात्मक पद्धतीमध्ये परीक्षेची मांडणी होत नाही तोवर त्या परीक्षेची तीव्रता वाढत नाही. नागरी सेवेसारख्या ‘डार्लिंग डेस्टिनेशन’ची सार्वजनिक प्रतिमा असलेल्या आणि वैद्यकीय, व्यवस्थापन व सॉफ्टवेअर अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांमध्ये इच्छुक उमेदवारांना पुढं नेणाऱ्या परीक्षा खरोखरच तीव्र स्वरूपाच्या असतात, असं विवाद्यरित्या म्हणता येईल. या रोजगाराच्या अत्युच्च मुक्कामांपर्यंत पोचण्यासाठीची आकांक्षा संबंधित इच्छुकांना लहानपणापासूनच स्पर्धेच्या कचाट्यात पकडण्याची शक्यता असते.
या वैशिष्ट्यपूर्ण रोजगारस्थळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या परीक्षा देणं आवश्यक असतं, त्यामुळं तिथल्या काही शे वा काही हजार जागांसाठी स्पर्धा करू पाहणारे प्रचंड संख्येनं उमेदवार स्वाभाविकपणे या परीक्षांकडं आकर्षित होतात. सर्वसाधारणतः परीक्षा या चाळणीसारख्या कार्यरत असतात आणि त्यातून यश कमी व अपयश अधिक निर्माण होतं. उदाहरणार्थ, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी: यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) आणि ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन्स (जीआरई), ग्रॅज्युएट मॅनेजमेन्ट अॅडमिशन टेस्ट (जीएमएटी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जॉइन्ट एन्ट्रन्स एक्झाम (आयआयटी-जेईई) आणि नॅशनल एलीजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (एनईईटी) यांसारख्या संस्थांच्या अखत्यारित घेण्यात येणाऱ्या या परीक्षांन लाखो उमेदवार बसतात, पण त्यातील केवळ काही हजार उमेदवारांची निवड होते.
परीक्षा व्यवस्थेतून यशापेक्षा अपयश अधिक प्रमाणात निर्माण होत असेल, तर अशा प्रकारच्या परीक्षा देण्यासाठी अधिकाधिक संख्येनं इच्छुक कसे काय तयार होतात, हा प्रश्न यातून उपस्थित होतो. या अपयशांबाबत आणि त्याच्या हानिकारक परिणामांबाबत सरकारला काहीच बेचैनी कशी वाटत नाही?
परीक्षेची विचारसरणीच अशी असते की, त्यामुळं व्यक्तिगत अपयश व निराशा यांची निष्पत्ती सामाजिक असंतोषामध्ये होत नाही, असंही विवाद्य विधान करता येईल. परीक्षेची संकल्पना इच्छुकांमध्ये निराशेपेक्षा अधिक आशा निर्माण करत राहते. किंबहुना, आशा व निराशा यांच्यातील तणावाचा समतोल साधण्याचं काम परीक्षा करते. स्वामित्वदर्शक कारकीर्दकेंद्री विचारसरणीमुळं इच्छुकांमध्ये पुढील प्रेरणा निर्माण होते: “आज मला यश मिळालंय, उद्या तुम्हाला यश मिळेल.” निराशेच्या विध्वंसक शक्तीला मवाळ करण्याचं काम आशेचा घटक करतो. यशस्वी उमेदवारांच्या उपलब्धींचं प्रदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम हे मुख्यत्वे जाहिरातबाजीसारखे असतात, त्यातून स्वामित्वदर्शक कारकीर्दकेंद्री विचारसरणीचा संदेश परिणामकारकरित्या दिला जातो. स्पर्धापरीक्षांमध्ये अंगभूतरित्या असलेल्या तार्किकतेच्या घटकाद्वारे निराशेच्या तीव्र भावनेला मवाळ करण्याचा हा प्रयत्न असतो. या परीक्षा नियमांच्या चौकटीत चालणाऱ्या व पारदर्शक असतात, त्यामुळं त्या तर्कशुद्ध असल्याचं मानलं जातं. परीक्षांच्या या तुलनेनं खुल्या स्वरूपामुळं इच्छुक उमेदवारांमध्ये विश्वास निर्माण होतो, परिणामी अंतिम विश्लेषणात त्यांना स्वतःच्या पराभवालाही तार्किक कारण असल्यासारखं वाटतं.
पराभव झालेले उमेदवार या प्रक्रियेचा दोष स्वतःकडं घेतात आणि तरीही वारंवार प्रयत्न करत राहतात, यातून पुन्हा अपयश येण्याची शक्यता असते आणि काही वेळा तर आत्महत्येसारखी टोकाची पावलंही उचलली जातात. आशा व निराशा यांच्यात समतोल साधण्यासाठीचा अवकाश स्पर्धापरीक्षांच्या विचारसरणीमधील अंगभूत तार्किकतेद्वारे पुरवला जातो. त्यामुळं व्यक्तिगत इच्छुक उमेदवार हा त्याच्या आकांक्षांपेक्षा या विचारसरणीला पुढं वाहून नेत असतो.
यशाचं आणि अपयशाचंही व्यक्तिकेंद्री चित्र उभं केल्यामुळं सरकारलाही रोजगारनिर्मितीबाबतच्या स्वतःच्या नैतिक जबाबदारीपासून पळ काढण्याची संधी मिळते. विविध संधीरचनांद्वारे साजेसा रोजगार निर्माण करणं, ही सरकारची जबाबदारी आहे. भारतीय तरुणामधील अशांतता आणि संताप यांच्याकडं वेळीच लक्ष दिलं नाही तर त्यात धोकादायक वाढ होऊ शकते, याची काही चिंता सरकारला असल्याचं दिसत नाही. चांगल्या रोजगाराच्या संधींचा अवकाश आकुंचित होतो आहे, याबद्दल सरकारनं अस्सल चिंता व्यक्त केल्याचं दिसत नाही. संधीच्या एकाच अवकाशावर- विशेषतः नागरी सेवा क्षेत्रावर इच्छा-आकांक्षांचा दबाव येणं, हे शासनरचनांच्या आरोग्याच्या दृष्टीनं योग्य लक्षण नव्हे, याचीही काही फिकीर सरकारला नसावी. याहून महत्त्वाचं म्हणजे, देशभरात सर्वत्र उगवत असलेल्या स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रांच्या वाढीला मुभा देण्यातही सरकारला काही चुकीचं वाटत नाही.
परंतु, अपयशामुळं आणि तीव्र निराशेमुळं व्यक्तीनं स्वतःचं जीवन संपवण्याचा मुद्दा व्यक्तिगत अपयशाच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य नाही, कारण यातून व्यवस्थेच्या उलटतपासणीपेक्षा आत्मचिंतन केलं जाईल. पात्र इच्छुकांना रोजगाराच्या पुरेशा संधी देण्यात सरकारला सातत्यानं अपयश आलं आहे. या संदर्भात, रोजगाराच्या इच्छा-आकांक्षा संधींच्या इतर अवकाशांमध्येही विखुरणं योग्य होईल, पण सध्या असे अवकाश अस्तित्वात नाही किंवा त्यांची संख्या अतिशय मोजकी आहे. शेती व उद्योग यांमधील रोजगाराचा गाभा व प्रतिष्ठा सरकारनं पुनर्स्थापित करायला हवी. रोजगाराचा हा प्राथमिक अवकाश अनुपस्थित असेल, तर भारतीय लोकसेवा आयोग हे मोजक्या लोकांसाठी प्रिय मुक्कामस्थळ राहील आणि अनेकांसाठी निराशेचं कारण ठरेल. ग्राहककेंद्री भांडवलशाहीमध्ये अशा प्रकारे व्यापक संधी निर्माण करण्याची संधी नाही असं दिसतं. उलट, या व्यवस्थेत काही नकारात्मक पर्याय निर्माण होतात, ज्यापासून अनेक इच्छुक उमेदवार दूर पळतात, कारण हे रोजगाराचे पर्याय स्वीकारणं आपल्या नैतिक मूल्याशी तडजोड करण्यासारखं होईल असं या इच्छुकांना वाटतं. या ‘अवमानकारक पर्यायां’पासून मुक्त होण्याच्या गरजेमुळं लोकसेवा आयोगासारख्या अधिक ‘सुरक्षित’ संधींवर ताण येतो. या अर्थी, स्पर्धापरीक्षांची व्यवस्था एखाद्या विचारसरणीसारखी कार्यरत असते- सातत्यानं दिसणाऱ्या अपयशाला तार्किक कारण द्यायचा तिचा प्रयत्न असतो आणि मोजक्या लोकांचं यश साजरं करून ही तार्किक मांडणी साधली जाते.
Credit; https://www.epw.in/
Comments
Post a Comment